बेळगाव : गत सरकारने अंमलात आणलेले तीन कृषी कायदे सत्तेवर येताच रद्द करण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, ते अद्याप मागे न घेतल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत वाढच होत आहे. हे कायदे तात्काळ मागे घ्यावेत. तसेच विजेसह अन्य समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बेळगाव जिल्हा रयत संघटनेतर्फे कर्नाटक राज्य रयत संघटना-हरितसेना माध्यमातून बुधवार दि. ४ सकाळी ११ वाजता हेस्कॉमच्या नेहरूनगरमधील मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. शेतातील कूपनलिकेला वीजपुरवठ्यासाठी असलेली आक्रम-सक्रम योजना बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना जवळपास २.५ लाखांपर्यंत भुर्दंड बसत आहे. हा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा असल्याने आक्रम-सक्रम योजना पुन्हा सुरु करावी. आधीप्रमाणे मोफत वीजपुरवठा सुरु करावा. विजेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास ताबडतोब १० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना सौरपंपांची सक्ती न करता वीजपुरवठा करावा. घरगुती वापरासाठी २०० युनिट मोफत वीज देण्याची योजना बंद झाली असून पुन्हा भरमसाठ बिल येत आहे. हा प्रकार बंद करून दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना २०० युनिट वीज मोफत द्यावी. शहरी भागाप्रमाणे शेतात घर असणाऱ्या शेतकऱ्यांना सिंगल फेज निरंतर वीज द्यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राज्य रयत संघटना-हरितसेनेचे राज्याध्यक्ष कोडिहळ्ळी चंद्रशेखर यांच्या आदेशानुसार आंदोलन होणार आहे. बेळगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बेळगाव शहर, तालुका रयत संघटना- हरितसेनेतर्फे करण्यात आले आहे.