तीन गुन्हे दाखल
बेळगाव : मुंबई क्राईम ब्रँच, गुप्तचर विभागाकडून व्हिडीओ कॉल केला असल्याचे भासवून ब्लॅकमेल करून महिलांचे नग्न व्हिडिओ काढल्याची घटना बेळगावात घडली आहे. याप्रकरणी बेळगाव सायबर क्राईम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी सांगितले की, बेळगावात तीन घटना घडल्या आहेत. मुंबई क्राईम ब्रँच किंवा गुप्तचर विभागाकडून तुमचे नाव एखाद्या प्रकरणात गुंतले आहे आणि त्याचा तपास करणे आवश्यक आहे, अशी धमकी देणारे व्हॉट्सॲप, संदेश किंवा कॉल करून त्यांची चौकशी करत आहोत असे सांगून महिलांना कॅमेरासमोर यायला सांगतो. बोलत असताना ही बाब बाहेरच्या कुणालाही कळू नये अशी धमकी देत घरच्यांना तुझ्याबद्दल सांगू अशी धमकी देत चौकशीच्या बहाण्याने महिलांना कपडे काढायला सांगतात, त्यानंतर त्यांचा स्क्रीन शॉट रेकॉर्ड करतात आणि कॉल कट करून व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करून पैशाची मागणी करतात. असे धक्कादायक प्रकार बेळगावात घडले आहेत. त्यामुळे महिलांनी सतर्क रहावे आणि अशा कोणत्याही कॉलची त्वरित तक्रार करावी.