बेळगाव : बेळगावमध्ये उभारण्यात येणारे भव्य नवीन जिल्हा स्टेडियम राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिभावंतांना चमकण्यासाठी व्यासपीठ ठरेल, अशी अपेक्षा बेळगावचे जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते आज बेळगावातील ऑटोनगर येथे नवीन जिल्हा स्टेडियमच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, बेळगावातील नेहरू स्टेडियमची मुदत दोन ते तीन वर्षात संपणार आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोनगर येथे सुमारे १५० कोटी रुपये खर्चून हे काम तीन टप्प्यात केले जाणार आहे. यासाठी बुडाने जमीन उपलब्ध करून दिली असून, हे काम ३-४ वर्षांत पूर्ण होणार आहे. येथे सामुदायिक इमारतीच्या उभारणीचाही विचार करण्यात आला असून याठिकाणी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभावंत घडावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
बेळगावमध्ये सर्वात मोठे स्टेडियम बांधण्यात येत असून यासाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. १४ एकर जागेत हे स्टेडियम उभारण्यात येत असून तीन वर्षांत हे काम पूर्ण होईल. विविध प्रकारच्या क्रीडा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन स्टेडियम बांधण्यात येत आहे. त्यामुळे बेळगावच्या क्रीडागुणांना चांगली संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ‘उत्तर’चे आमदार आसिफ सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हा आयुक्त मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, नगर सेवक व बुडा नामनिर्देशित सदस्य हणमंत कोंगाळी, सी. के. जोरापुरे, सुरेश यादव, यल्लेश चौगुले आदी उपस्थित होते.