पोक्सो न्यायालयाचा आदेश; रायबाग तालुक्यातील घटना
बेळगाव : तीन वर्षाच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून ठार मारणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा पोक्सो न्यायालयाने शुक्रवारी (दि. २७) सुनावली.
कुरबगोडी (ता. रायबाग) येथे २१ सप्टेंबर २०१७ रोजी दोषी नराधम उद्दप्पा रामाप्पा गाणगेर (वय ३२) याने शेजारच्या तीन वर्षाच्या बालिकेला चॉकलेटचे आमिष दाखवून बाजूला असलेल्या उसात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर बालिकेच्या तोंडात, डोळ्यांत माती घालून खून केला. याप्रकरणी हारुगेरी पोलिस ठाण्यात पालकांनी बालिका बेपत्ताची असल्याची तक्रार दाखल केली होती.
तत्कालीन पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी यांनी याप्रकरणी सखोल तपास करून न्यायालयात नराधम गाणगेर याच्या विरोधात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांच्यासमोर सुनावणी झाली. २५ साक्षीदारांच्या तपासणीच्या आधारे व ५२ कागदपत्रे, ८ पुराव्यांच्या आधारे आरोपी उद्दप्पा रामाप्पा गाणगेर याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. आरोपीला फाशी आणि ४५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने पीडित बालिकेच्या पालकांना जिल्हा कायदा सेवा प्राधिकारकडून तीन लाख रुपये भरपाई मिळण्याचे आदेश दिले. विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी फिर्यादीच्या वतीने काम पाहिले.