बेळगाव : महानगरपालिकेच्या भ्रष्ट आणि ढिसाळ कारभारामुळे कोट्यवधींच्या विकासकामावर पाणी सोडण्याची वेळ बेळगाव महानगरपालिकेवर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या हुकूमशाहीमुळे महानगपालिकेवर ही नामुष्की ओढवली असून महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात सोमवारी सकाळी ११ वाजता सरदार्स मैदान येथून आयोजित केलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष, समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले आहे. शनिवारी जत्तीमठ येथे पत्रकार परिषद झाली.
यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, स्मार्ट सिटीच्या नावाखाली भोंगळ कारभार सुरू आहे. रस्ते करण्याच्या नावाखाली दडपशाही करून अनेकांची घरे पाडली आहेत. घर पाडल्याने नागरिकांचे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई तत्कालीन अधिकाऱ्यांकडून वसूल करावी. शहरातील जनतेने कर भरल्यानंतर जमा झालेला पैसा चुकीच्या पद्धतीने वापरला जाऊ नये, यासाठी नागरिकांनी सजग राहिले पाहिजे, महापालिकेच्या भ्रष्टाचारविरोधात स्वस्थ बसून चालणार नाही. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील समस्या आणि भ्रष्टाचारविरोधात आवाज उठवण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. ज्या ठिकाणी अपूर्ण कामे आहेत, त्याबाबतची माहिती सोमवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत आणून द्यावीत, अशी माहितीही दिली आहे.
माजी महापौर मालोजी अष्टेकर, दत्ता जाधव, माजी नगरसेवक अनिल पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर आदी यावेळी उपस्थित होते. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी स्वागत केले. मोर्चाला माजी नगरसेवक संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन संघटना, युवा समितीसह शहरातील अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta