बेळगाव : येथील संजीवीनी फौंडेशनच्या वतीने दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिनी समाजातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो.
यावर्षी ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असलेले आर. एम. पाटील आणि गरीब रुग्णांना सेवा आणि आसरा देणाऱ्या करुणालयच्या संस्थापिका अनिता रॉड्रिग्स यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
लोकमान्य रंगमंदिर येथे एक ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवाजी कागणीकर
कट्टनभावी, निंगेनहट्टी, गुरामहट्टी कडोली आदी ग्रामीण भागात दोन लाख झाडांची लागवड, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, तलाव, विहिरी व बंधाऱ्याची निर्मिती करून जमीन ओलिताखाली आणणे, मनुष्यासह पशुपक्षांनाही सुखावणारे, नरेगा या योजनेमधून सर्वांना काम मिळवुन दिलेलं आहे. यासोबतच निरक्षरासाठी प्रौढ शिक्षण तसेच अरण्य भागात मुलामुलींसाठी शिक्षण सुरू करणारे डॉ. शिवाजी कागणीकर यांच्या आदर्श आणि प्रेरणादायी कार्याचा सन्मान होणार आहे.
आर. एम. पाटील
नागनूर, तालुका मुडलगी जिल्हा बेळगाव १९८० साली बर्डस संस्थेची स्थापना. बर्डस संस्थेच्या माध्यमातून तुक्कानट्टी येथे १०३ एकर जागेत विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवप्रभा वसती शाळा, आठवी ते दहावीसाठी ज्युनियर टेक्निकल स्कुल, मतिमंद मुलांसाठी पहिली ते आठवीपर्यंतची शाळा. बीएसडब्लू आणि एमएसडब्लू कॉलेज, कृषि विज्ञान केंद्र, पंधरा एकरमध्ये औषधी उद्यान जवळपास चाळीस खेड्यात साक्षरता मिशन राबविले आहे.
संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही भागामध्ये सेक्स वर्कर्ससाठी मोलाची कामगिरी त्यांनी बजावली आहे त्यांच्या माध्यमातून सगळीकडे वेगवेगळ्या संघटना सुरू करून दिल्या आहेत. एकूणच संपूर्ण ग्रामीण अभिवृद्धी करण्यासाठी आर एम पाटील यांची कामगिरी मोलाची आहे.
अनिता रॉड्रिक्स
अगदी लहान वयात विधवा झाल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या तीन मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी पडली, त्यांचे संगोपन करण्यासाठी सेंट पॉल स्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्या.
जेव्हा जेव्हा त्यांना सुट्टी असायची त्यावेळी त्या मदर थेरेसा यांनी सुरू केलेल्या हुबळी येथील ‘स्नेहा सदन’मध्ये स्वयंसेविका म्हणून काम करत, हे काम करत असताना त्यांना समाजसेवेबद्दलची आवड निर्माण झाली. मुलांचे शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यावर अनिता यांनी सेंट पॉलच्या मुख्याध्यापकपदाचा राजीनामा देऊन स्वतः जमा केलेल्या रक्कमेतून नावगे येथे दोन एकर जमीन खरेदी केली व २००४ साली समविचारी मित्रांसह लिओमेल सोसायटीची स्थापना केली व यातून करुणालय या आश्रमात मरणासन्न आणि निराधारांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला चार ते पाच लोकांपासून सुरू केलेल्या करुणालय आश्रमात आज जवळपास ७५ लोक आश्रय घेत आहेत. यामध्ये अर्धांगवायू झालेले रुग्ण, मानसिक रुग्ण तसेच मतिमंद रूग्णसुद्धा आहेत. मदर तेरेसा यांच्या प्रेरणेने मी आज हे काम करत असल्याचे त्या आवर्जून सांगतात.
Belgaum Varta Belgaum Varta