कागवाड : कागवाड तालुक्यानजीक असलेल्या महाराष्ट्रातील म्हैसाळ (ता. मिरज) गावात विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
रविवारी सकाळी शेतकरी असलेल्या वनमोरे कुटुंबातील चौघेजण गुरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले होते. यावेळी उसाच्या शेतात विजेची तार तुटून जमिनीवर पडली होती. याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांनी तारेवर पाऊल ठेवल्याने त्यांना विजेचा धक्का बसला, यात तिघे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. श्रीकृष्ण वनमोरे (वय ३५), पारसनाथ वनमोरे (वय ४०) आणि साईराज वनमोरे (वय १२) अशी मृतांची नावे आहेत, तर हेमंत वनमोरे (वय १५) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणाची नोंद मिरज ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.