बेळगाव : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा समारंभ दिनांक 9/10/2024 रोजी मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात पार पडला. या समारंभाला सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि सदा सरवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बेळगावची कन्या अनुष्का आपटे हिने “सं. लावणी भुलली अभंगाला” या भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे यांच्यातर्फे बसवण्यात आलेल्या ‘गंगा’ या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक पटकाविले. ज्येष्ठ रंगकर्मी वासुदेव विष्णुपुरीकर यांच्या हस्ते पदक, सन्मान पत्र आणि रोख बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरच्या केशवराव भोसले सभागृहात पार पडली.
नाटकात गाणे म्हणत नृत्य करणे अवघड असते. पण अनुष्का हे इतकं सहजपणे निभावते की प्रेक्षकांना गाणे ध्वनिमुद्रित आहे असेच वाटते.
अनुष्काला लहानपणापासूनच नाटकाची आवड होतीच. सुनीता ताई पाटणकर आणि मेधाताई माराठेंच्या नाट्य शिबिरांमध्ये तिला अभिनयाचे प्रशिक्षण मिळाले. मेधा ताईंच्या दिग्दर्शनात तिने सं.सौभद्र, सं.शारदा आणि सं.स्वयंवर मध्ये प्रमुख भूमिका केल्या.