बेळगाव : ६७ वर्षापासून सीमा बांधव काळा दिन मोठ्या गांभीर्याने पाळतात. येणाऱ्या काळा दिनाच्या सायकल फेरीला परवानगी देऊ अथवा ना देवो आम्ही ही सायकल फेरी निर्धाराने पार पाडू असा, निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी व्यक्त केला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दि. १३ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष मनोहर किणेकर होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. भारताचे उद्योगपती रतन टाटा, मध्यवर्तीचे उपाध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या आई पद्मावती बळवंत देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच बेळगाव ग्रामीण मतदारसंघ व यमकनमर्डी मतदार संघातून बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीवर नियुक्त झालेल्या नवीन सदस्यांच्या नावांचे वाचन केले व उपस्थित सदस्यांनी टाळ्याच्या गजरात त्याला अनुमोदन दिले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी आपले विचार व्यक्त केले. सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होईपर्यंत मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहावे. तरच सीमा भागातील मराठी भाषिकांचे हित आहे. तरुणांनी राष्ट्रीय पक्षाच्या नादी लागू नये, नजीकच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती संघटना मजबूत करण्यासाठी तळागाळापर्यंत कार्य करूया. येणारा काळा दिन यशस्वी करूया असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बि. डी. मोहनगेकर, आर. के. पाटील, गोपाळ पाटील, मनोहर संताजी, मनोहर हुंदरे, मारुती परमेकर, एम. जी.पाटील, आदींनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी लक्ष्मण होनगेकर यांनी आभार व्यक्त केले.