बेळगाव : इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा क्रीडा संघटनेच्यावतीने डॉ. जे. टी. सिमंड्स हॉलमध्ये घेण्यात आलेल्या बेल्ट परीक्षेत पाच खेळाडूंना ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. विविध बेल्टसाठी झालेल्या या परीक्षेत एकूण 85 कराटेपटू सहभागी झाले होते.
श्लोक गड्डी, यशस्विनी किल्लेकर, श्रद्धा अंगडी, मृणांक किल्लेदार व श्रेयस अंगडी ब्लॅक बेल्टचे मानकरी ठरले.
या कराटेपटूंना जिल्हा स्पोर्ट्स कराटे संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ब्लॅक बेल्ट मिळविलेल्या खेळाडूंच्या पालकांचादेखील शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
बेल्ट प्रदान कार्यक्रमाला आशियाई मेथडिस्ट एपिस्कोपल चर्चचे अध्यक्ष दिनकर चिल्लाळ, बेम्कोचे वरिष्ठ व्यवस्थापक सतीश नाईक, सेंट जर्मेन शाळेचे अध्यक्ष उदय इडगल, बांधकाम व्यावसायिक रवि करेण्णावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
इंडियन कराटे क्लबच्या प्रशिक्षक हेमलता काकतीकर, प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, नताशा अष्टेकर, विनायक दंडकर, ऋतिक लाड, वैभव कणबरकर, कृष्णा जाधव, वचना देसाई, कल्याणी ताशिलदार आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.
ब्लॅक बेल्ट मिळविलेले पाचही कराटेपटू गेल्या सहा वर्षांपासून चव्हाट गल्लीतील संस्थेत कराटे प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचा सराव करीत आहेत. त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन अनेक पदके मिळविली आहेत.