बेळगाव : कळसा भांडुरा नाला, मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष मध्यवर्ती समिती, नरगुंद महिला संघर्ष राज्य समितीच्या वतीने म्हादई योजना राबविण्यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज अभिनव आंदोलन करण्यात आले.
शुक्रवारी कळसा भांडुरा प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी बेळगावच्या कित्तूर चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन करण्यात आले. उत्तर कर्नाटकातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर काम सुरू करावे. कणकुंबी येथील कळसा भांडुरा कालव्यातून मुबलक पाणी आहे. हे पाणी वापराविना वाया जात आहे. गेल्या 60 वर्षांपासून या योजनेच्या अंमलबजावणीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत आम्ही चाबूक मोर्चा काढून सरकारला इशारा दिला आहे. मात्र कळसा भांडुरा प्रकल्प तातडीने सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक विजय कुलकर्णी यांनी दिला.
आंदोलनात सहभागी झालेल्या त्रिवेणी पटथ यांनी सांगितले की, कळसा भांडुरा प्रकल्प गेल्या 60 वर्षांपासून प्रलंबित आहे. हे पाणी वापरण्यासाठी गोवा सरकारने कोणतीही योजना केलेली नाही. सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत देत असून प्रतिसाद न मिळाल्यास दिल्लीत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कळसा भांडुरा नाला, मलप्रभा नदी जोडणी युवा संघर्ष मध्यवर्ती समिती, नरगुंद महिला संघर्ष राज्य समितीचे पदाधिकारी तसेच मनोहर कालकुंद्रीकर, सुभाष दुधाळे, शिवानंद मेटी, दुधाप्पा पाटील, राजशेखर कोळगी, शिवरुद्रय्या पत्री, विनायक पाटील, अजित बजंत्री, संताजी संभाजी, गुरु हुल्हेर. विद्या कालकुंद्रीकर, प्राजक्ता कालकुंद्रीकर, तेजश्री पायन्नावर, यल्लाप्पा शिंत्री, सदाशिव हिरेमठ आदींनी आंदोलनात सहभाग घेतला होता.