बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवार दिनांक २० रोजी दुपारी ठीक २.०० वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन (ओरिएंटल स्कूल जवळ) येथे आयोजित करण्यात आली आहे.
१ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने त्यावेळेच्या म्हौसूर आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. तेव्हापासून एक नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून सीमाभागात कडकडीत हरताळ पाळण्यात येतो व या दिवशी बेळगावमध्ये मूक सायकल फेरी काढण्यात येते. येणारा एक नोव्हेंबर हा दिन गांभीर्याने पाळण्यासाठी व मुक सायकल फेरी यशस्वी करण्यासाठी व कार्यकर्त्यांचे विचार ऐकण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने ही बैठक आयोजित केली आहे. तरी या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी, नियंत्रण या घटक समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेर व चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी केले आहे.