बेळगाव : पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेल्या राजहंसगड किल्ल्यावर आज शनिवार दि. 19 रोजी ऑस्ट्रेलियन पर्यटकांचे आगमन पाहायला मिळाले. साऊथ क्रॉस युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलिया येथील 30 पर्यटकांनी राजहंसगड किल्ल्याला भेट दिली. गडावरील श्री सिद्धेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती समोर जाताना विदेशी ऑस्ट्रेलियन पर्यटकांनी पायातील बूट व चप्पल काढून श्रद्धेने आणि अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले.
राजहंसगडावरील तैनात असलेल्या टुरिझम डिपार्टमेंटच्या पोलिसांकडून पर्यटकांना चांगले सहकार्य मिळाले. गडावरील पुरातन वास्तू, दगडी बांधकाम, बाहेर पडण्याचा चोर दरवाजा, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती, किल्ल्याचे सुशोभीकरण, व स्वच्छता पाहून हे विदेशी पर्यटक भारावून गेले. जवळपास तीन तास या विदेशी पर्यटकांनी गडावरती पर्यटनाचा आनंद लुटला.