बेळगाव : उद्यापासून सुरु होणाऱ्या कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर येथील नियोजित कार्यक्रमस्थळाची पाहणी तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसंदर्भात आज जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदारांनी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज कित्तूर येथील कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. व्यासपीठ, जनतेची आसन व्यवस्था यासह संपूर्ण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या महोत्सवात अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून उत्सवादरम्यान कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा प्रशासन आवश्यक ती सर्व खबरदारी घेत आहे. कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून हा उत्सव मोठ्या थाटामाटात करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
आमदार बाबासाहेब पाटील बोलताना म्हणाले, उद्यापासून सुरु होणाऱ्या कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून आज बेळगावमध्ये देखील विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत. प्रशासकीय पातळीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून उद्यापासून भव्य कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta