बेळगाव : शहरात सध्या झालेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. तर दुसरीकडे लक्ष्मी टेक येथील जलवाहिनी फुटून पाणी पाण्याचे लोंढे रस्त्यावर वाहताना दिसत आहे. सकाळच्या वेळी शहराकडे येणाऱ्या नागरिकांना या पाण्याच्या लोंढ्यांमधून वाट काढत वाहने घेऊन यावी लागत होती. पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत असूनही एल अँड टी कंपनीने याकडे गांभीर्याने लक्ष पुरविलेले नसल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. त्यासाठी पूर्वनियोजन करण्यात गलथान कारभार एल अँड टी कंपनी जलवाहिन्यांच्या दुरुस्तीबाबत देखील उदासीन आहे याचे प्रत्यंतर या ठिकाणी येत आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे शहराला पाणीपुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे.