शिवस्वराज संघटनेचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन
बेळगाव : राष्ट्रीय महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवस्वराज संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना दिले आहे.
बेळगाव ते अनमोड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेऊन अनेक वर्षे उलटली आहेत. तसेच बेळगाव ते होनकल पर्यंतच्या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तर उर्वरित रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागणार आहे. परंतु महामार्गासाठी भू संपादन केल्यानंतर शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई देणे गरजेचे होते मात्र अद्यापही खानापूर तालुक्यातील शंभरहून अधिक शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागत आहे. यावेळी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्याकडून नुकसान भरपाई लवकरच दिली जाईल
असे आश्वासन दिले जात आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयाचे अनेकदा उंबरठे झिजवून देखील अद्याप अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाला तातडीने भरपाई देण्याची सूचना करावी अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री जारकीहोळी यानी ज्या शेतकऱ्यांना अद्याप भरपाई देण्यात आलेली नाही त्यांना भरपाई देण्याची सूचना केली जाईल असे आश्वासन दिले. जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनाही सरदेसाई यांनी निवेदन देण्यात आले.
………………………………………………………………………..
शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील भरपाई देण्यासाठी चिरमिरी मागितली जात आहे. त्यामुळे अगोदरच कमी भरपाई मिळत असताना अधिकाऱ्यांना कशासाठी चिरमेली द्यावी असा प्रश्न देखील निरंजन सरदेसाई यांनी चर्चेवेळी उपस्थित केला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची रक्कम न घेता भरपाई देण्याची सूचना करावी अशी मागणी केली.
रस्त्यामध्ये कमर्शियल जागा गेलेल्यांना हि मोबदला देण्यात यावा.