बेळगाव : एक नोव्हेंबर रोजी दिवाळीचा सण यापूर्वीही आला होता. त्यावेळीही काळा दिनाची फेरी काढली होती. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे यावेळी ही सायकल फेरी काढली जाणार आहे, त्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, अशी माहिती शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिली.
आम्ही ६८ वर्षांपासून काळा दिन पाळत आहोत. त्यामुळे यावर्षी दिवाळी सण असला तरी काळ्यादिनाची फेरी निघणारच, असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी पोलिसांसमोर व्यक्त केला.
काळ्यादिनाबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. २५) मार्केट पोलिस ठाण्यात निरिक्षक श्रीशैल गाबी यांनी म. ए. समिती नेत्यांना बोलवून त्यांच्यावर दबाव घालण्याचा प्रयत्न केला.
काळ्या दिनाला वरिष्ठांनी परवानगी दिलेली नाही. तरी तुम्ही बैठका घेऊन काळा दिन होणारच असल्याचे सांगत आहात. यावर्षी १ नोव्हेंबरलाच दिवाळी सण आहे. राज्योत्सव आहे, त्यामुळे काळा दिन पाळू नये, असे गाबी यांनी सांगितले. त्यावर मालोजी अष्टेकर आणि प्रकाश मरगाळे यांनी भाषावार प्रांतरचना झाली. त्यावेळीही दिवाळी होती. त्यानंतर अनेकदा काळ्या दिनीच दिवाळी होती. त्यावेळीही आम्ही काळा दिन पाळला. निषेध फेरी काढली. त्यामुळे यंदा दिवाळी असली तरी आमची फेरी निघणारच आहे. राज्योत्सव आता साजरा करण्यात येतो. आम्ही त्याआधीपासून काळादिन पाळत आहोत. त्यामुळे आमची फेरी निघणारच, असे सांगितले.
यावेळी पोलिस उपनिरिक्षक सौदागर, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर उपस्थित होते.