कागवाड : तालुक्यातील मंगळसुळी ऐनापूर रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे वळणावर नियंत्रण सुटून रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्ह्यातील कराविर तालुक्यातील कोटेरा गावातील आदर्श युवराज पांडव (वय 27) आणि शिवानी आदर्श पांडव (वय 20) यांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी हे दाम्पत्य त्यांच्या फोर्ड कारमधून तालुक्यातील ऐनापूर येथे नातेवाईकाच्या घरी, लग्न समारंभासाठी आले होते. लग्न समारंभ उरकून घरी परतत असताना मंगळसुळी ऐनापुर रस्त्याच्या वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी खड्ड्यात पडली.
कारमध्ये एकूण सात प्रवासी प्रवास करत होते, रुपाली गाडेकर, कुणाल गाडेकर, राजवीर पांडव, अनवी पांडव, पूजा बामणे यांना किरकोळ दुखापत झाली.
याप्रकरणी कागवाड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. डीवायएसपी प्रशांत मुन्नोल्ली, सीपीआय संतोष हल्लूर, पीएसआय जी.जी. बिरादार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta