बेळगाव : कर्नाटक सरकारच्यावतीने बेळगावमध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन भरविण्यात येत असते याला विरोध म्हणून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. या मेळाव्याला परवानगी देऊ नये, महामेळावा घेण्यात येऊ नये यासाठी कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांची कोल्हेकुई सुरु झाली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कन्नड संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना या संघटना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हद्दपार करण्यात यावे, अशी वल्गना करत कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धिंगाणा घातला. राणी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सदर महामेळावा हा राजकीय हेतूने भरविण्यात येतो. यामुळे या महामेळाव्याला प्रशासनाने परवानगी नाकारावे अशी मागणी कन्नड रक्षण वेदिकेच्या शिवरामगौडा गटाकडून करण्यात आली आहे.