बेळगाव : राज्यात गर्भवती महिला व नवजात शिशुंच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मागील वर्षभरात ७५ हून अधिक गर्भवती महिला व ३२२ नवजात शिशूचा मृत्यू झाला असल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. या विरोधात सोमवार दि. १६ रोजी भाजप महिला मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात महिला सुरक्षित नाहीत यामुळे आपल्या हक्कांसाठी महिलांनाच रस्त्यावर उतरावे लागत आहे. चांगल्या आरोग्य सुविधा नसल्याने गर्भवती महिलांचे मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी सोमवारी अलारवाड ब्रिज कॉर्नरनजीक आंदोलन करणार असल्याची माहिती प्रदेश महिला मोर्चाच्या शोभा गौडा यांनी दिली. आंदोलनाला भाजपचे प्रदेश अध्यक्ष विजयेंद्र, विरोधी पक्षनेते, स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेवेळी महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा शांभवी अश्वतपुरा, प्रदेश सचिव डॉ. सोनाली सरनोबत, उज्ज्वला बडवाण्णाचे यांच्यासह इतर उपस्थित होत्या.