बेळगाव : विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, शिष्यवृत्तीच्या वितरणात होणारा भेदभाव थांबवावा आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिक बस सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागण्यांसाठी आज बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) वतीने आंदोलन करण्यात आले.
आज बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकात विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. उच्च शिक्षण मंत्री आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या स्वीकारून त्या विधानसभेत मांडून तोडगा काढेपर्यंत आंदोलन स्थळ सोडणार नसल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. यावेळी पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये वादावादीही झाली.
सरकारने तातडीने शैक्षणिक शुल्क भरण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर कराव्यात. या समस्येमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, शिष्यवृत्तीच्या वाटपात सरकार भेदभाव करत आहे, ही समस्या देखील सोडवावी. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, पण शक्ती योजना लागू केल्यामुळे बसवर अवलंबून असलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरकारने त्वरित अधिक बस सुविधा पुरवाव्यात. जर सरकारने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा एबीव्हीपीचे नेते भूषण घोडगेरी यांनी दिला. यावेळी शेकडो एबीव्हीपी सदस्य आंदोलनात सहभागी झाले होते.