बसवजय मृत्युंजय स्वामीजी
बेळगाव : लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या घटनेचा निषेध करत श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथे अनिश्चितकाळासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
लिंगायत पंचमसाली आरक्षण आंदोलनकर्त्यांवर लाठीमार झाल्याच्या निषेधार्थ आणि लिंगायत समाजाचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी माफी मागावी, या मागणीसाठी श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली अनिश्चितकाळासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनाची सुरुवात राणी चन्नम्मा चौकात राणी चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर गांधी भवनात आंदोलन सुरू करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना श्री बसवजय मृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, “लिंगायत पंचमसाली आंदोलनकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंचमसाली समाजाच्या आंदोलनाला ‘असंवैधानिक आंदोलन’ असे केलेले विधान मागे घ्यावे आणि लिंगायत पंचमसाली समाजावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जावेत. जर आज आंदोलनासाठी योग्य जागा दिली नाही, तर उद्या राष्ट्रीय महामार्ग बंद करून तीव्र आंदोलन छेडले जाईल. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर होणारे आंदोलन सध्या गांधी भवनात हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सिसी पाटील यांनी वेगळ्या ठिकाणाची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, ठिकाण मिळाले नाही, तर उद्या महामार्ग रोखण्याची घोषणा स्वामीजींनी केली.या आंदोलनाला पंचमसाली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.