बेळगाव : कंग्राळी खुर्द, बेळगाव येथे आयोजित 19 व्या पर्वातील ‘मराठा साम्राज्य चषक -2024’ या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ संघाने हस्तगत केले, तर बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सदर नुकत्याच यशस्वीरित्या पार पडलेल्या भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना (एस. आर. एस.) हिंदुस्थान अनगोळ संघाने प्रतिस्पर्धी बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाला 43 धावांनी पराभूत केले. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एस. आर. एस. हिंदुस्थान संघाने मर्यादित 5 षटकात 3 गडी बाद 39 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाला 5 षटकात 7 गडी बाद 23 धावा काढता आल्या. या पद्धतीने पहिल्या डावात 16 धावांची आघाडी मिळवणाऱ्या एस. आर. एस. हिंदुस्थान संघाने आपल्या दुसऱ्या डावात 5 षटकात 3 गडी बाद 53 धावा झळकावून प्रतिस्पर्धी संघासमोर विजयासाठी 70 धावा काढण्याचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी ठरलेल्या बालाजी स्पोर्ट्स कडोली संघाला मर्यादित 5 षटकात 5 गडी बाद अवघ्या 27 धावा जमवता आल्या. या पद्धतीने एस. आर. एस. हिंदुस्थान अनगोळ संघाने 43 धावांनी विजय मिळवत मराठा साम्राज्य चषक हस्तगत केला.
अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी एस. आर. एस. हिंदुस्थान संघाचा राकेश असलकर हा ठरला. त्याचप्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज किताबाचे मानकरी अनुक्रमे बालाजी स्पोर्ट्स कडोलीचा सुशांत आणि अभि हे दोघे ठरले. स्पर्धेतील मालिकावीर पुरस्कार एस. आर. एस. हिंदुस्थान संघाच्या वसंत शहापूरकर याने पटकाविला. अंतिम सामन्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राकेश पाटील, प्रशांत पाटील, दर्शन पाटील, प्रशांत निलजकर, कलाप्पा पाटील, विनायक कम्मार, निखिल पाटील, कल्लाप्पा अष्टेकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta