बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर
बेळगाव : मराठा बँकेच्या निवडणुकीत लक्ष्मण होनगेकरांच्या विजयामुळे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची विजयी पर्वाची सुरुवात आता सुरू झाली आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने एकीने, निष्ठेने, नियोजनाने कार्य केल्यास यासारखे यश प्रत्येक निवडणुकीत मिळेल व समितीचा भगवा प्रत्येक ठिकाणी फडकूया, असे उद्गार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले. बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कॉलेज रोडवरील समितीचे कार्यालयात रविवार दिनांक २९ रोजी संपन्न झाली. या बैठकीचे अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
सचिव ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले. मराठा बँकेच्या निवडणुकीत संचालकपदी विजयी झालेले लक्ष्मण होनगेकर यांचा माजी आमदार मनोहर किणेकर यांनी पुष्पहार घालून सत्कार केला.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर पुढे म्हणाले की, मराठा बँकेच्या निवडणुकीतून विद्यमान आघाडीतून लक्ष्मण होनगेकर व बी. एस. पाटील यांना बाजूला सारले होते, परंतु बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी या दोघांना विजयी करण्यासाठी निश्चय करून प्रयत्न केल्यामुळे लक्ष्मण होनगेकरांच्या रूपाने आम्हाला विजय प्राप्त झाला आहे. यामुळे या विजयाने सर्वांच्या आत्मविश्वास वाढला आहे. यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण एक दिलाने कार्य करूया असे उद्गार त्यांनी व्यक्त केले. युवा नेते आर. एम. चौगुले यांनीही आपले विचार व्यक्त केले.
लक्ष्मण होनगेकर म्हणाले की, माझ्यावर जो अन्याय झाला होता, तो अन्याय दूर करण्यासाठी बँकेच्या संचालकांनी व बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी निष्ठेने कार्य केल्यामुळे यशाची माळ माझ्या गळ्यात पडली आहे. हा विजय माझ्या जीवनातला फार मोठा विजय आहे आणि हा विजय मी आयुष्यभरात कधीही विसरणार नाही. या विजयासाठी ज्या बँकेच्या सभासदांनी, नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मला मदत केली त्या सर्वांचे मी ऋणी आहे व त्यांच्या हितासाठी मी पुढील काळात कार्य करीन असे म्हणाले.
यावेळी सचिव ऍड. एम. जी. पाटील, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर, युवा नेते आर. एम. चौगुले, लक्ष्मण पाटील, मनोहर संताजी, विठ्ठल पाटील,अनिल पाटील, मनोहर हुंदरे, डी. बी. पाटील, पियुश हावळ, राजू किनेकर, शंकर कनेरी, सोमनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.