बेळगाव : बेळगावच्या जिल्हा रुग्णालयाच्या (बिम्स) प्रसूती व शिशु आरोग्य विभागात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवतीच्या प्रकृतीत गंभीर बिघाड झाला आहे. गर्भात बाळाचा मृत्यू झाल्याने आईची गंभीर अवस्था झाली आहे. पुढील उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवले जात आहे. स्थानिक सरकारी रुग्णालयांमध्येच उपचार मिळावेत आणि रुग्णांचे प्राण वाचावेत, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
गोकाक तालुक्यातील मेलमट्टी गावातील राधिका मल्लेश गड्डीहोळी (१९) ही गर्भवती आज सकाळी ४ वाजता प्रसूतीसाठी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (बिम्स) दाखल झाली होती. मात्र, तिच्या प्रकृतीत गंभीर बिघाड होऊन तिला फिट्स येऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बिम्समधील डॉक्टरांनी तिला पुढील उपचारांसाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलवले आहे. गर्भवती राधिकाच्या प्रकृतीत बिघाड झाल्यावर मेलमट्टी येथून प्रथम यमकनमर्डीच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, फिट्स येऊ लागल्याने तिला केएलई रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला. पण, आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालयात (बिम्स) दाखल करण्यात आले. येथेही डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारांसाठी तिला किम्समध्ये हलवण्याचा सल्ला दिला. सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये चांगले उपचार उपलब्ध होण्यासाठी सरकारने पावले उचलावी, अशी मागणी करताना राधिकाच्या नातेवाईकांनी भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली.राधिकाचा पतीही योग्य उपचार मिळवण्यासाठी अनेक रुग्णालयांत फिरत होता. सध्या जिल्हा रुग्णालयातील (बिम्स) डॉक्टरांनी तिची गंभीर स्थिती लक्षात घेऊन तिला किम्सकडे पाठवल्याचे त्यांनी सांगितले.
गर्भवतीला फिट्स येऊन ती सध्या बेशुद्ध अवस्थेत आहे. व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात (बिम्स) कार्डिओलॉजिस्ट आणि न्यूरोसर्जनची कमतरता असल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. तिला योग्य उपचार मिळवून देण्यासाठी आम्ही किम्सकडे पाठवत आहोत. जिल्हा रुग्णालयात दरमहा ७०० ते ८०० प्रसूती होतात, यामुळे डॉक्टरांवरील कामाचा ताण वाढला आहे. वेळेवर दाखल झाल्यास अधिक चांगले उपचार दिले जाऊ शकतात, असे जिल्हा सर्जन डॉ. विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.