बेळगाव : आनंदनगर वडगाव येथील वादग्रस्त नाला बेकायदेशीर असून कोणत्याही कागदपत्रात सदर नाल्याची नोंद नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. पावसाळ्याचे पाणी तसेच परिसरातील सांडपाणी निचरा करण्यासाठी अस्तित्वात नसलेला नाला निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आनंदनगर येथील रहिवाशांनी केला आहे. त्या संदर्भात काल आनंदनगर येथील रहिवाशांनी आंदोलन करत संताप व्यक्त केला. त्याचप्रमाणे नाल्या संदर्भातील सर्व कागदपत्रे रहिवाशांसमोर सादर करून त्यांना विचारात घेऊनच नाल्याचे बांधकाम करावे, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
सातबारा उतारा त्याचप्रमाणे अनगोळ ग्रामीण नकाशा तसेच इतर सहा अधिकृत सरकारी कागदपत्रांमध्ये आनंदनगर येथील नाल्याची नोंद नाही असे असून देखील पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी सदर नाला निर्मितीचा घाट प्रशासनाकडून घालण्यात आला आहे. या नाला निर्मितीसाठी अनेक स्थानिक रहिवाशांची मालमत्ता व बांधकाम हटविण्याच्या नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांची घरे जमीनदोस्त करण्याची वेळ आली आहे. सरकारी कागदपत्रांवर कोणतीच नोंद नसलेला नाला निर्मितीचा घाट स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घातला आहे त्यामुळे आनंदनगर येथील रहिवाशात संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात काल सोमवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी रहिवाशांनी आपला विरोध दर्शवत आंदोलन केले आणि कोणालाही कोणताही त्रास न होता या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
आनंदनगर येथील नाला बेकायदेशीर असून या नाल्याची कोणतीच नोंद अधिकृत सरकारी कागदपत्रात नाही त्यामुळे प्रशासनाला आमची एकच विनंती आहे की सदर नाल्याची नोंद असलेले कागदपत्रे स्थानिक रहिवाशांसमोर सादर करून पुढील कारवाई करावी, अशी मागणी आनंदनगर येथील रहिवासी संतोष पवार यांनी केली आहे. पूर्वी शेतजमीन असलेल्या आनंदनगर परिसरात नवीन वसाहती वाढल्या आहेत. पूर्वी घरे नसताना या जागेतून नाल्याचे सांडपाणी जात होते त्यानंतर या ठिकाणी घरे बांधली गेली ही वस्तुस्थिती असताना कागदोपत्री कोणतीच नोंद नसलेला नाला बेकायदेशीररित्या अस्तित्वात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी खटाटोप चालविला आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींकडे गेले असता लोकप्रतिनिधींनी आनंदनगर येथील रहिवाशांच्या या समस्येकडे पूर्णतः पाठ फिरवली आहे आणि खाजगी जागेत उभारलेल्या मालमत्तेवर जेसीबी फिरवत एक प्रकारे हुकूमशाही चालवली आहे. त्याला आनंदनगर येथील रहिवाशांचा तीव्र विरोध असून प्रशासनाने ही कृती वेळेत थांबवावी त्याचप्रमाणे अस्तित्वात नसलेला नाला निर्माण करण्याचा खटाटोप करण्याऐवजी सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जावी जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही, अशी मागणी देखील संतोष पवार यांच्यासह आनंद नगर येथील रहिवाशांनी केली आहे