बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका महापौर तसेच मागील काही महिन्यांपूर्वी सीमाभागातील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती तथा म. ए. समिती सांगली शाखा पदसिद्ध अध्यक्ष श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांचा सांगली भेटीवेळी सत्कार करण्यात आला.
डिसेंबर महिण्यात म. ए. समितीच्या वतीने महावेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कन्नड संघटनांच्या गुंडांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी साहेब यांच्यावर भ्याड हल्ला करुन शाहीफेक केली होती. त्या घटनेचे सर्वदूर उमटले.
त्या घटनेनंतर दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी सांगली येथे ज्येष्ठ नेते ऍड. अजित सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली खाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष सर्वानी एकमताने सीमाप्रश्नी सर्वपक्षीय सांगली कृती समिती स्थापन करत यापुढे प्रत्येक वेळी सीमावासीयांच्या अन्यायाविरुद्ध बळ देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सांगली शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर तातडीने दळवी साहेबांच्या हल्ल्या विरोधात 15 डिसेंबर 2021 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे निदर्शने करून निवेदन देण्यात आले होते. त्याचबरोबर छ. शिवाजी महाराज यांच्या अवमानाविरुद्ध बेळगावातील मराठी युवकांना अटक करण्यात आली होती तेव्हा सुद्धा या समितीने आंदोलन करत निवेदन सादर केले होते.
वेळोवेळी सीमावासीयांच्या बाजूने लढण्यासाठी आणि बळ देण्यासताही जी सांगली समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीचे अभिनंदन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितिच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली आणि युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.
या वेळी महापौर श्री. दिग्विजय सूर्यवंशी यांनी सीमालढ्या विषयी आपल्या आठवणी ताज्या केल्या, त्यांचे आजोबा शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वातंत्र्य सैनिक, माजी आमदार भाई भगवान सूर्यवंशी हे भाई दाजीबा देसाई आणि भाई एन. डी. पाटील यांच्या सोबत लढ्यात सक्रिय होते आणि आपले आजोळ हे बेळगाव असल्याने आपण स्वतःही या लढ्यात सक्रिय आहोत आणि यासाठी लाठी खाऊन तुरुंगात सुद्धा गेलो आहोत त्यामुळे सीमावासीयांच्या लढ्याविषयी आपल्याला विशेष आदर आहे असे नमूद केले.
यावेळी उपाध्यक्ष सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, राजू कदम, प्रवीण रेडेकर, प्रतीक पाटील, सिद्धार्थ चौगुले, जोतिबा पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta