संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांचा मनमानी कारभार चांगला आहे. संकेश्वरात २४×७ पाणीपुरवठा योजनेच्या नावाखाली ईटी साहेब लोकांची लुबाडणूक करीत आहेत. अशा हट्टीखोर मुख्याधिकारीची संकेश्वरकरांना आवश्यकता नाही. हुक्केरीचे आमदार व राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी ईटी यांची बदली अन्यत्र करावी, अशी मागणी संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, दिलीप होसमनी यांनी केली आहे. ते म्हणाले, मुख्याधिकारींनी पाणीपट्टी मिटर रेडिंगनुसार न करता पूर्ववत वर्षाकाठी १५६० रुपये करण्याची मागणी संकेश्वर घटक काॅंग्रेसतर्फे आणि पालिकेतील काॅंग्रेस नगरसेवकांनी यापूर्वीच केली आहे. पालिकेत सर्व २८ सदस्यांनी पाणीपट्टी वर्षाकाठी २ हजार रुपये आकारणीचा ठराव मंजूर केलेला असताना जगदीश ईटी यांनी सदस्यांचा ठराव आणि काॅंग्रेसची मागणी धुडकावून लावत मिटर रेडिंगनुसार पाणीपट्टी आकारणी चालू ठेवली आहे. अन्यायकारक पाणीपट्टी वसूलीचे कार्य करणाऱ्या ईटी यांनी राजीनामा देवून अन्यत्र बदली करुन घेऊन येथून जावे. अन्यथा त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.