बेळगाव : कर्नाटकात येत्या जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी मतपत्रिकेच्या (बॅलेट पेपर) माध्यमातून घेतल्या जाणार आहेत, अशी माहिती कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जी. एस. संग्रीशी यांनी दिली. आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांच्या तयारीसंदर्भात बेळगाव भेटीवर आले असता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सरकारकडून राखीवता यादी मिळाल्यानंतर कर्नाटक राज्य निवडणूक आयोग राज्यातील जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणूका घेण्याची प्रक्रिया हाती घेईल. सदर निवडणुका येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात होतील असे त्यांनी सांगितले.
संग्रीशी म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेच्या माध्यमातून सदर निवडणुका घ्याव्यात या संदर्भात अलीकडेच मी संबंधित लोकांसमवेत बैठका घेऊन चर्चा केली आहे. ईव्हीएम मशीन हॅक केल्याचे आरोप केले जातात. त्याची पुनरावृत्ती होऊ नये, तसेच निवडणुका मुक्त व पारदर्शी वातावरणात व्हाव्यात यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची ही सर्वोत्तम पद्धत आम्हाला पुन्हा कर्नाटक राज्यात लागू करायची आहे.
निवडणूक घेण्यासाठी राखीवता यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली नसल्याबद्दल सरकार विरुद्धची अवमान याचिका प्रलंबित आहे. या दाव्याची पुढची तारीख 29 जानेवारी आहे. अशी माहिती देऊन सरकारचे संबंधित खाते जितक्या लवकर राखीचता यादी सादर करेल तितके ते निवडणूक आयोगासाठी एप्रिल किंवा मे महिन्यात निवडणुका घेण्याच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे, असे मत आयुक्त संग्रीशी यांनी व्यक्त केले.
निवडणुका मुक्त व पारदर्शी अर्थात भ्रष्टाचार आणि आमिष
मुक्त झाल्या पाहिजेत हा आमचा उद्देश आहे. आजकालच्या निवडणुका किती कुलषीत पद्धतीने होत आहेत हे राजकीय पक्ष, मतदार, अधिकारी वगैरे सर्वांनाच माहित आहे. प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करणारी व्यक्ती आज राजकारणात टिकू शकत नाही. आजकाल निवडणुका म्हणजे धनाढ्य लोकांची मक्तेदारी झाली आहे. परिणामी प्रामाणिकपणे जनसेवा, देशसेवा करू इच्छिणार्या उमेदवारांवर अन्याय होतो, यासाठीच यावेळच्या जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका या भ्रष्टाचार व आमिष मुक्त व्हाव्यात यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मतदारांनी देखील याला सहकार्य करून कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. कारण पैसे अथवा अन्य अमिषाला बळी पडून मतदान केल्यास, आपल्याला अन्यायाविरुद्ध जाब विचारण्यास नैतिक अधिकार उरत नाही, हे मतदाराने लक्षात घेतले पाहिजे.
आपल्या भागाचा पर्यायाने आपला विकास साधावयाचा असेल तर मतदारांनी सक्षम राहून योग्य उमेदवाराला मतदान केले पाहिजेत. निवडणूक म्हणजे मतदारांची मने जिंकण्याची एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपल्या कर्तृत्वावर पार पाडण्या ऐवजी, पैसे वगैरे आमिषांचा वापर करून निवडणुका लढविल्या जातात, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असे मत जी. एस. संग्रीशी यांनी व्यक्त केले.
Belgaum Varta Belgaum Varta