बेळगाव : जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) चे नूतन अध्यक्ष यल्लाप्पा पाटील व त्यांच्या नव्या कार्यकारिणीचा अधिकारग्रहण समारंभ रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला.
वेंगुर्ला रोडवरील मधुरा हॉटेल येथे झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी गोवा विधान परिषदेचे माजी सभापती राजेश पाटणेकर हे होते. यावेळी प्रमुख वक्ते ज्योती कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील यांच्यासह जायंट्स फेडरेशन अध्यक्ष तेजेश्वर राव, जायंट्स केंद्रीय समितीचे सदस्य दिनकर अमीन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी जायंटसची प्रार्थना झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच सर्व पाहुणे मंडळींचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्याद्वारे कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी फेडरेशन अध्यक्ष तेजेश्वर राव यांनी जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या नूतन संचालकांचा शपथविधी केला, तर केंद्रीय समितीचे सदस्य दिनकर अमीन यांनी नूतन अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांना अध्यक्षपदाची शपथ देवविली.
शपथविधीनंतर व्यासपीठावरील मान्यवरांची भाषणे झाली. त्यामध्ये दिनकर अमीन यांनी जायंट्स ग्रुपच्या कार्याचा आढावा घेत सर्व पदाधिकाऱ्यांना जायंट्स ही संस्था फक्त लहान संस्था राहिली नसून जगभरामध्ये ही संस्था मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे असे सांगितले. आगळ्या कार्य पद्धतीमुळे या संस्थेची सदस्य संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये ही संस्था घर करून राहिली असून नुतन पदाधिकाऱ्यांनी सन्मान राखून या संस्थेचे कार्य वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर नूतन अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांचा विविध संस्था-संघटना आणि हितचिंतकांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अधिकारग्रहण समारंभास शहरातील निमंत्रित प्रतिष्ठित नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि जायंट्स सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सेक्रेटरी श्रीमुकुंद महागांवकर यांनी केले. शेवटी उपाध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta