
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णय
बेळगाव : शहरात प्रभाग समित्यांची स्थापना करण्यासाठी पुन्हा एकदा अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रभाग समित्यांबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. बैठकीला महापालिका आयुक्त शुभा बी., महापालिकेच्या कौन्सिल विभागाचे अधिकारी, प्रभाग समिती संघटनेचे पदाधिकारी अनिल चौगुले व विकास कलघटगी उपस्थित होते. प्रभाग समित्यांसाठी याआधी तीनवेळा अर्ज मागविले आहेत. आता चौथ्यांदा अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुढील दोन ते तीन दिवसांत याबाबतची अधिसूचना काढली जाईल. अर्ज दाखल करण्यांसाठी २२ दिवसांची मुदत असेल. यावेळी तरी प्रभाग समित्यांसाठी आवश्यक अर्ज दाखल होणार का? हे पाहावे लागणार आहे. प्रभाग समित्यांची स्थापना व्हावी, यासाठी प्रभाग समिती संघटनेच्या माध्यमातून तीन वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. गुरुवारीही त्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेतली होती. निवेदनही त्यांनी दिले होते. त्याची दखल घेत गुरुवारी सायंकाळीच त्यांनी महापालिका आयुक्तांना बोलावून घेतले व याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची सूचना दिली. अर्ज मागविण्याचा निर्णय घेतला. याआधी प्रत्येक प्रभागात किती अर्ज दाखल झाले आहेत, याची माहिती कौन्सिल विभागाकडून दिली. ५८ पैकी २५ प्रभागांत सहा व त्यापेक्षा जास्त अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे मंगळूर महापालिकेच्या धर्तीवर या २५ प्रभागांत प्रभाग समिती स्थापन करावी, अशी विनंती चौगुले व कलघटगी यांनी केली. त्यामुळे शहरातील सुमारे ५० टक्के भागात प्रभाग समित्या कार्यरत होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली; पण मंगळूर महापालिकेच्या धर्तीवर प्रभाग समित्यांची स्थापना करता येत नाही, असे आयुक्त म्हणाल्या.
यावेळी प्रभाग समितीचे प्रसाद कावळेकर, डॉ. एस. व्ही. दिवेकर, ऍड. प्रथमेश कारेकर, सुरेशबाबू सन्नक्की, लक्ष्मण हणमसागर, रामकृष्ण तेंडुलकर, मनीषा सिंग, सरोज अळवणी, रेश्मा जाधव, सुधा माणगांवकर, उर्मिला माळी, अर्चना पाटील, लक्ष्मी तहसिलदार, अजित कुडची, ऍड. वैभव कुद्रे आदी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta