
निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कित्तूरनजीक भरधाव कारची ट्रकला मागून धडक बसल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चिकोडी येथील सहकार निबंधक कार्यालयातील व्दितीय दर्जा अधिकारी अमित नायकू शिंदे (वय 44 रा. अकोळ, ता. निपाणी) हे ठार झाले. तर कारमधील आणखीन तिघेजण जखमी झाले.
अपघातातील जखमींवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महालिंग सदाशिव खुबी (वय 30), सद्दाम हुसेन जमादार (वय 32), नरसु विठ्ठल बन्ने (वय 28,रा. तिघेही अकोळ) अशी तिघा जखमींची नावे आहेत. यातील सद्दाम जमादार यांची प्रकृती गंभीर असुन बंगळूरहून परतत असताना (रविवार) सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. घटनेची नोंद कित्तूर पोलिसात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, चिकोडी येथील सहकार निबंधक कार्यालयातील द्वितीय दर्जा अधिकारी अमित शिंदे हे आपले मित्र महालिंग खुबी, सद्दाम जमादार, नरसू बन्ने यांच्यासमवेत मूडबिद्री येथे गेले होते. तेथून ते बंगळूर येथून मूळगावी परतत होते. प्रवासावेळी अमित कार चालवत होते. त्यांची कार महामार्गावर कित्तूर नजीक आली असता पुढे निघालेल्या ट्रकला कारची मागून धडक बसली. यामध्ये अमितसह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान जखमींना तातडीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचारासाठी नेत असताना अमित यांचा वाटेतच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळतात कित्तूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी हलवले. अमित यांच्या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ यांनी चालवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta