

राणी चन्नम्मा नगर परिसरातील घटना
बेळगाव : भरदिवसा महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना राणी चन्नम्मा नगर सेकंड स्टेज उद्यमबाग पोलीस स्थानकाच्या हद्दीत सोमवारी सकाळी घडली आहे. या घटनेमुळे या परिसरात एकच खळबळ माजली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगन हे एलअँडटी कंपनीचे अधिकारी असून, ते राणी चन्नम्मानगर येथील सेकंड फेजमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ते कामावर गेले असताना, टीशर्ट आणि मास्क घातलेला एक व्यक्ती घरी आला आणि त्याने मुरुगन यांच्या पत्नी प्रियंकादेवी यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली व त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याचे साडेसात तोळे दागिने हिसकावले व पळ काढला. भयभीत झालेल्या मुरुगन यांच्या पत्नीने त्यांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे त्यांनी घराकडे धाव घेतली व घरची कडी काढली. त्यानंतर उद्यमबाग पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला व श्वानाच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध उद्यमबाग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Belgaum Varta Belgaum Varta