बेळगाव : माती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या चाकात सापडून 8 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना काल सोमवार दि. 27 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वडगाव बाळकृष्ण नगर दुसरा क्रॉस येथे घडली आहे. आरुष महेश मोदेकर वय 8 रा. कणबर्गी बेळगाव असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आरुष हा आपल्या आई सोबत नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी कणबर्गी येथून वडगाव येथे आला होता. सोमवारी सायंकाळी लहान मुलांसोबत खेळताना माती भरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागच्या ट्रॉलीच्या चाकात सापडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. आरुष हा आपल्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे घटनास्थळी आईने फोडलेला हंबरडा पाहून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
घटनास्थळी शहापूर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. ट्रॅक्टर मालकविरोधक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.