
बेळगाव : इस्कॉनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या येथील ‘हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवा’ची सांगता रविवारी
हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
“सामान्यतः दोरी ही बंधनाचे प्रतीक आहे. परंतु, रथाची दोरी भाविकांना भौतिक बंधनातून मुक्त करण्यास मदत करते”असे प्रतिपादन ‘इस्कॉन’मॉरिशसचे सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांनी केले. रथयात्रेप्रसंगी आयोजित प्रवचनात ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की , “रथयात्रा हे भक्त आणि भगवंत यांच्यामधील आदान प्रदान दर्शविते. भक्त ज्या प्रेम भावनेने रथाची दोरी ओढतात. तितक्याच तीव्रतेने भगवंत प्रतिसाद देतो. भक्तांवर कृपा करण्यासाठी धावतो”
रविवारी मंगलारती, तुळशी आरती, नरसिंह आरती, नाम जप, गुरू आरती करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यलीला आदी कार्यक्रम झाले. दोन दिवस महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. शनिवारी ‘इस्कॉन’च्या वतीने शहरातील विविध भागात ‘हरेकृष्ण रथयात्रा’ काढण्यात आली होती तर श्री राधा गोकुळ आनंद मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या विविध मंडपात विवीध कार्यक्रम झाले. त्यामध्ये वैष्णव यज्ञ झाला ज्यामध्ये अनेक जोडप्यानी सहभाग दर्शविला.
रथयात्रेनिमित मंदिरात श्री जगन्नाथ, श्री बलराम, श्री सुभद्रामय्या आणि गौरनिताय राधाकृष्ण यांच्या मूर्तींना आकर्षक फुलांची आरास करण्यात आली होती. वैष्णव यज्ञाचे पौरोहित्य माधव चरण प्रभू व गौरांग प्रसाद प्रभू यांनी केले. या महायज्ञात शंभरहुन अधिक दांपत्यांचा सहभाग होता. विश्वशांतीसाठी हा महायज्ञ करण्यात आला.
रविवारी सकाळी ‘इस्कॉन’चे वृंदावन प्रभू यांचे प्रवचन झाले. दिवसभर दर्शन आणि सायंकाळनंतर महाप्रसादासाठी भाविकांची गर्दी झाली होती. शहरासह ग्रामीण भाग आणि निपाणी, खानापूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर येथील कृष्ण भक्त महोत्सवात सहभागी झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta