
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरूवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव यांच्या वतीने आज इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन मराठी विद्यानिकेतन येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश पाटील सर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले. पाहूण्यांचे स्वागत सुरेश पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. आकाश चौगुले यांनी करिअर निवडीच्या संधी कोणत्या आहेत, त्याची पूर्वतयारी कशी करावी याचा सविस्तर आढावा घेतला, तर श्री. राजकुमार पाटील यांनी आपल्या भाषणात शालेय शिक्षण हे जसे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असते तसेच ते त्यांच्या भविष्यातील करिअर साठीचा देखील पाया असते. विशेषतः इयत्ता दहावी हा तर आपण या करिअर वाटेवरचा पहिला टप्पाच मानतो. कारण दहावीतल्या परफॉर्मन्सवरच विद्यार्थ्यांच्या पुढच्या शाखा आणि म्हणून करिअर वाटा निश्चित होणार असतात. पण ही परिस्थिती नेमकी आजही अशीच आहे का? की नवी क्षेत्रे, नवं तंत्रज्ञान, नवा व्यापार उदिम, नव्या कौशल्यांची मागणी आणि अगदी अलीकडचे एआय वगैरे यांनी शिक्षण आणि करिअर यांच्या संबंधांवर काही परिणाम केला आहे? खाजगी क्षेत्रातील करिअर हा एक भाग पण मग स्पर्धा परीक्षांच्या तयारितून साध्य होणारा प्रशासकीय सेवांचा किंवा शासकीय अधिकारी होण्याचा मार्ग नेमका कसा आहे? शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना याची तयारी करणं म्हणजे नेमकं काय करायचं? याची सविस्तर माहिती त्यांनी मांडली. अध्यक्षीय समारोप प्रा. सुरेश पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन व संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शिवराज चव्हाण यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta