
संकेश्वर : बहुचर्चित ठरलेल्या हिरा शुगरच्या नूतन अध्यक्षपदी बसवराज कल्लटी तर उपाध्यक्षपदी अशोक पट्टणशेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गत दिवसांपूर्वी हिरा शुगरचे चेअरमन व आमदार निखिल कत्ती यांनी आमदार असल्याने लोक संपर्क ठेवण्यात अडचणीत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आज त्या रिक्त जागी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड सकाळी ११ वाजता कारखाना आवारातील गेस्ट हाऊसवर संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात वरील निवड करण्यात आली.
बैठकीस आमदार निखिल कत्ती गैरहजर होते. मात्र संचालक प्रभूदेव पाटील, शिवनायक नाईक, आप्पासाहेब शिरकोळी, सुरेश बेल्लद, बाबासाहेब आरबोले, बसाप्पा मरडी, सुरेंद्र दोडलिंगणावर हे उपस्थित होते.
दरम्यान माजी खासदार अण्णासाहेब जोले यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा सत्कार करून म्हणाले, राजकारण विरहित सहकार तत्वावर संचालक मंडळाला कारखाना चालवण्यास जोल्ले समूह बिरेश्वर बँक व अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या मदतीने बेळगाव डीसीसी बँकेतर्फे हिरा शुगरला अर्थपुरवठा करण्यास सहकार्य करू. निपाणीच्या हालसिद्धनाथ कारखाना पॅटर्ननुसार कामगार व शेतकरी बांधवांचे हित जपण्याचा आमचा मानस राहील. लवकरच हिरा शुगरच्या इथेनॉल व वीज प्रकल्प सुधारण्यास प्राधान्य देऊ तर सभासदांना ५० किलो व गाळपास आलेल्या ऊस उत्पादकांना प्रति टन अर्धा किलो साखर देणार आहोत असे सांगितले.
सत्काराला उत्तर देताना नूतन उपाध्यक्ष अशोक पट्टणशेट्टी म्हणाले, जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हिरा शुगर सहकार तत्वावर जोमाने चालवू यासाठी अधिक ऊस गाळप करण्यावर आम्ही लक्ष देणार असे सांगितले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत व्यवस्थापक संचालक सत्याप्पा कर्कीनाईक यांनी केले. आभार बाबासाहेब आरबोळे यांनी मानले.
हिरा शुगर वर १९९५ पासून कत्ती गटाची सत्ता होती. विशेषतः २३ सप्टेंबर रोजी कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत इथेनॉल व वीज प्रकल्प राबवण्यास आलेल्या खर्चाची रक्कम परतफेड करण्यासाठी लिजवर देण्यासाठी संचालक मंडळांना अधिकार देण्यात आले होते. मात्र संचालक मंडळाच्या बैठकीत लीजवर देण्यास काही संचालकांनी विरोध दर्शविला होता.
यावेळी मोहन कोटीवाले, पवन पाटील, राजेंद्र गड्ड्यांवर, बसवराज पाटील, बंडा घोरपडेसह गडहिंग्लज, निपाणी, हुक्केरी, संकेश्वर भागातील शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta