
बेळगाव : हिडकल जलाशयातून हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा त्याला जाऊ नये आणि त्यासाठी हाती घेण्यात आलेले जलवाहिनी घालण्याचे काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी येत्या दि. 5 मार्च 2025 रोजी बेळगाव शहरातील संघ -संस्था, संघटना आणि समस्त नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पुन्हा एकदा जोरदार आवाज उठवण्याचा निर्णय ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ समितीने बोलाविलेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज मंगळवारी सकाळी ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. हिडकल जलाशयातून हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करण्यास बेळगाव शहरासह जिल्ह्यातून विरोध असतानाही सदर योजनेचे काम सुरूच असल्याबद्दल बैठकीत चर्चा करून मते अजमावण्यात आली.
यावेळी माजी आमदार रमेश कुडची, माजी महापौर शिवाजी सुंठकर, शेतकरी नेते राजू मरवे, रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण -पाटील आदींनी आपले विचार व्यक्त करताना हुबळी -धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकलचे पाणी देण्याच्या विरोधातील लढा अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त केली. सदर योजनेला आळा घातला नाही तर येत्या काळात पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या योजनेविरुद्धच्या लढ्यात शहरासह जिल्ह्यातील समस्त संघ-संस्था, संघटनांसह प्रत्येक नागरिकांनी सहभागी झाले पाहिजे, असे यावेळी नमूद करण्यात आले. बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta