
महाराष्ट्र एकरण समितीच्या शिष्टमंडळाचे शरद पवारांना साकडे
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत सुरू असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिले आहेत.सीमा प्रश्नाच्या लढ्यात अग्रेसर असलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्तेही दिल्लीला आले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने काल शुक्रवारी ज्येष्ठ नेते आणि संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्नी तातडीने आणि गांभीर्याने हालचाली कराव्यात अशी मागणी केली आहे. या संदर्भात शरद पवार यांना निवेदनही देण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार यांची भेट घेण्यात आली.यावेळी मरगाळे म्हणाले,सीमा प्रश्नी उच्च अधिकार आणि तज्ञ समितीची तात्काळ निवड केली जावी. दोन्ही समित्यांची लवकरात लवकर बैठक बोलावण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयात दोन वकिलांची तातडीने नेमणूक करण्यात यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या खटल्यात अन्य एका साक्षीदाराचे नावही नोंदविण्यात यावे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी सीमा प्रश्ना संदर्भात सविस्तर चर्चा करून न्यायालयीन कारवाई लवकरात लवकर पुढे नेण्याबाबत चर्चा करण्यात यावी.
हे विषय अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर आहेत. याची महाराष्ट्र सरकारने तात्काळ दखल घेणे आवश्यक आहे. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिक, महाराष्ट्र सरकार आणि सर्वोच्च न्यायालयातील डाव्याकडे टक लावून बसली आहे.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने तात्काळ हालचाली कराव्यात. अन्यथा बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांना मुंबईत धरणे आंदोलन करावे लागेल असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. शरद पवार यांनी निवेदनाचा स्वीकार करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्या महाराष्ट्र सरकारला निश्चित कळवू असे आश्वासन दिले आहे.
यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, खानापूर तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, बाबू कोले, सुनील आनंदाचे, उमेश पाटील, सुहास हुद्दार, मारुती मरगाणाचे राजाराम देसाई, भीमसेन करंबळकर, रवळू वड्डेबैलकर यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta