बेळगाव : कन्नड येत नसेल तर कर्नाटकात का राहतेस? असे बस प्रवासावेळी विचारत युवतीला शिवीगाळ करणाऱ्या परिवहन बस वाहकाला नागरिकांनी धारेवर धरल्याची घटना बाळेकुंद्री खुर्द येथील बस थांबल्यावर घडली; पण बसवाहकाने याला भाषिक वादाचा रंग चढवत ‘मराठीत का बोलत नाहीस?’ म्हणून मराठी भाषकांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप केला आहे.
बाळेकुंद्री खुर्द गावात भाषिकवादाची कोणतीही आज घटना घडलेली नाही. या ठिकाणी मराठी भाषिकांसह कन्नड आणि ऊर्दू भाषिक गुण्यागोविंदाने राहतात; पण अशा गावात भाषिकवाद असल्याचा आरोप करत बस वाहकाने चूक झाकण्याचा प्रयत्न केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बाळेकुंद्री येथील युवती आणि युवक सीबीटी येथून बाळेकुंद्रीकडे जात असताना युवतीने बाळेकुंद्रीपर्यंतची दोन तिकिटे मागितली; पण वाहकाने दोन्ही तिकीटे देताना ‘शक्ती’ योजनेची मोफत तिकिटे दिली. पण, चूक लक्षात येताच वाहकाने युवतीशीच वाद घातला. मोफत दोन तिकिटे का घेतलीस? अशी विचारणा केल्यानंतर युवतीने मराठीत त्याला सांगण्याचा प्रयत्न केला.
अन् वाहकाने कन्नडमध्ये बोलण्याचा हट्ट धरला. मात्र युवतीने आपल्याला कन्नड येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आणखीनच संतापत वाहकाने ‘कन्नड येत नसेल, तर कर्नाटकात का राहतेस’, अशी हुज्जत घालत युवतीला अर्वाच्च शिवीगाळ केली. त्यामुळे युवतीने पालकांना ही माहिती देताच बाळेकुंद्री खुर्द येथे बस येताच वाहकाला याचा पालकांनी जाब विचारला. वाहकाची वर्तणूक पाहून नागरिकांनी त्याला चोप दिला. दरम्यान, वाहकाने कोलांटउडी घेत युवतीनेच भाषिक वाद निर्माण केल्याचा आरोप केला. प्रसार माध्यमांसमोर माहिती देताना ‘तू कन्नड का बोलत नाहीस’ म्हणून युवतीने वाद घातला आणि गावात बस आल्यानंतर आपल्याला मारहाण केली’, असा कांगावा वाहकाने केला.
कन्नड संघटना आणि सोशल मीडियावरून मराठा भाषकांनी कन्नड भाषिक वादाला खतपाणी देखील घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्याने केला. प्रत्यक्षात बाळेकुंद्री खुर्दमध्ये कोणताही भाषिक वाद नाही. तरी भाषिक वादाची जोड बसवाहकाकडून दिली जात आहे, असा आरोपही होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta