
बेळगाव : शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स या उपक्रमांतर्गत मुलांना सेंद्रिय पदार्थांची ओळख व्हावी, सेंद्रिय शेतीबद्दल जागृती निर्माण व्हावी यासाठी शाळेत सेंद्रिय पदार्थ प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीदादा कागणीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश पाटील होते. मुलांना सेंद्रिय पदार्थांची माहिती मिळावी. सेंद्रिय पदार्थांचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, याची जाणी व्हावी. तसेच सध्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा वापर वाढत चाललेला आहे, या रासायनिक खतांचा व औषधांचा आपल्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम याबद्दल जागृती करण्यासाठी व सर्वांनी सेंद्रिय शेतीचे अनुकरण करावे. सेंद्रिय पदार्थांचा स्वीकार करावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. तसेच मुलांना व्यापारी व व्यवहार ज्ञान कौशल्य विकसित व्हावे यासाठी या सेंद्रिय पदार्थ प्रदर्शन व विक्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीदादा कागणीकर यांनी आपल्या बेळगाव परिसरात सध्या शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दल आकर्षण निर्माण झाले आहे, पण योग्य बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे जर अशा पद्धतीने शाळांमध्ये सेंद्रिय पदार्थ खरेदी करून त्याची विक्री केली तर शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, नीला आपटे, अरूण बाळेकुंद्री, मंगेश बाळेकुंद्री, प्रमोद नेर्लीकर, अनंत नेर्लीकर, बहुसंख्य शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष ओऊळकर यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, स्वागत व प्रस्ताविक इंद्रजीत मोरे यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta