
बेळगाव : आमच्या महाविद्यालयाला यु जी सी कडून स्वायत्त दर्जा मिळाल्यानंतर प्रथमच बी. ए., बी. कॉम. आणि बी. बी. ए. या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे की, आम्ही यु जी सी व आर. सी. यु. बेळगावच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहोत. स्वायत्त महाविद्यालयाचे वर्ग सुरू करण्यापूर्वी आम्ही राज्यातील इतर स्वायत्त महाविद्यालयांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला आणि त्यानुसार एक त्रुटीविरहित निकाल जाहीर करीत आहोत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी एस वाय प्रभू यांनी आर. पी. डी. स्वायत्त महाविद्यालयाच्या प्रथम सत्राच्या निकालाचे प्रकाशन केले.
निकाला संदर्भात अधिक माहिती देताना अभय पाटील म्हणाले, वरील अभ्यासक्रमांच्या परीक्षा १४ फेब्रुवारी २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत झाल्या. केवळ ११ दिवसांत निकाल प्रक्रिया पूर्ण करून निकाल जाहीर केला जात आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी सहज उपलब्ध व्हावी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्य रहावे, यासाठी वेळेत परीक्षा घेऊन निकाल देणे हा स्वायत्त महाविद्यालय म्हणून मुख्य उद्देश आहे.
सदर परीक्षेसाठी तीन वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली. एक महाविद्यालयातील शिक्षकांनी तर दोन बाह्य परीक्षकांनी प्रश्नपत्रिका तयार केल्या. या तीन प्रश्नपत्रिकांपैकी एक प्रश्नपत्रिका अंतिम परीक्षेसाठी निवडण्यात आली. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता कायम ठेवण्यात आली. तसेच, आमच्या संस्थेने दुहेरी मूल्यमापन प्रणाली स्वीकारली आहे, ज्यामध्ये अंतर्गत आणि बाह्य परीक्षकांकडून स्वतंत्र मूल्यमापन केले जाते. दोन्ही परीक्षकांनी दिलेल्या गुणांच्या सरासरीनुसार विद्यार्थ्यांना अंतिम गुण देण्यात आले. बी. ए., बी. कॉम. आणि बी. बी. ए. या अभ्यासक्रमांच्या एकूण ३२ उत्तर पत्रिकांचे मूल्यमापन करण्यात आले.
अंतर्गत व बाह्य परीक्षकांनी दिलेल्या गुणांमध्ये १५% पेक्षा जास्त गुणांचा फरक आढळल्यास उत्तरपत्रिका तृतीय मूल्यमापनासाठी पाठवण्यात आल्या. अशा ७५ उत्तरपत्रिका तृतीय मूल्यमापनासाठी विचारात घेण्यात आल्या. तृतीय मूल्यमापनानंतर जवळच्या दोन गुणांकनांची सरासरी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
निकाल प्रक्रियेत कठोर मूल्यांकन पद्धती अवलंबून गुणवत्तेची उच्च पातळी कायम राखण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आव्हान मूल्यांकन ची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थी आपल्या मिळालेल्या गुणांबाबत समाधानी नसतील, तर परीक्षा शाखेने निश्चित केलेले शुल्क भरून चॅलेंज मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. जर विद्यार्थ्याला अपेक्षित गुण प्राप्त झाले, तर संपूर्ण शुल्क परीक्षा विभागाकडून परत केले जाईल असे ही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यां हितासाठी वाढीव गुण देण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. कमी गुणांनी नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा केवळ १ किंवा २ गुणांमुळे प्रथम श्रेणी किंवा द्वितीय श्रेणी गमावणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्याची तरतूद करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि मूल्यांकन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रत (photo copy) आणि पुनर्गणना (Retotaling) ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या उत्तरपत्रिकेच्या मूल्यमापनाबाबत शंका असल्यास, परीक्षा शाखेने ठरवलेल्या शुल्काच्या बदल्यात ही सुविधा घेऊ शकतात.
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ या कलावधीत बी. ए. प्रथम सत्रात कु. भक्ती राजेश कुर्टकोटी हिने ८९.९० % गुणांसह प्रथम आली. तर श्री. रोहन राजशेखर सनाराई याने ८८.५०% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. बी. कॉम. प्रथम सत्रात कु. वैभवी विठोबा दळवी हिने ८७.५०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर कु. श्रद्धा दत्ता शिंदे हिने ८६% गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
बी. बी. ए. प्रथम सत्रात कु. स्नेहा महेश शेट्टी हिने ८३.५०% गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर श्री. अँटोनेट फर्नांडिस याने ८०.९० % गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
एस. के. इ. संस्थेचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर व्हाईस चेअरमन श्री. एस. वाय. प्रभू , अशोक शानबाग, श्रीनाथ देशपांडे, मधुकर सामंत, ज्ञानेश कलघटगी यांचे प्रोत्साहन मिळाले. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. एस वाय प्रभू यांनी आर. पी. डी स्वायत्त महाविद्यालयाच्या प्रथम सत्राच्या निकालाचे प्रकाशन केले. परीक्षा विभागप्रमुख डॉ. कुरणी यांनी परीक्षा मूल्यमापन पद्धती व निकाल यांचा आढावा घेतला. परीक्षा विभागाच्या सदस्य डॉ. शर्मिला संभाजी, प्रा. नंदकुमार हिरेमठ , प्रा. यामिनी गावडे यांनी काम पहिले. आभार डॉ. शर्मिला संभाजी यांनी मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta