एसडीएमसीची जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार; आंदोलनाचा इशारा
बेळगाव : कंग्राळी खुर्द प्राथमिक मराठी शाळेतील गत दोन मुख्याध्यापकांनी आर्थिक गैरव्यवहार केला आहे. याबाबत त्यांनी कबुली देऊनही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच गैरव्यवहार केलेली रक्कमही अद्याप जमा केलेली नाही. आठ दिवसांत रक्कम जमा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा एसडीएमसी, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी नुकताच जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिला.
मागील काही वर्षापासून शाळेत कायमस्वरुपी मुख्याध्यापक नाही. त्यामुळे, वरिष्ठ शिक्षकांकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्याकाळात गैरव्यवहार झाला आहे. २०२१-२२ मध्ये प्रभारी मुख्याध्यापकाने डीबीटी खात्यातील रक्कम मुलांना न वाटताच लाटली. वाचनालयाचे १३ हजार रुपयांचे अनुदान स्वतःसाठी वापरले. शाळेतील लोखंडी बेंच, जुने साहित्य विकून ५० हजार रुपयांची रक्कम लाटली आहे. त्यानंतर कायमस्वरुपी मुख्याध्यापक रुजू झाले. त्यांनी एसडीएमसी खात्यातील रक्कम ठराव नसताना काढली. माध्यान्ह आहार खात्यातील तीन लाखांपेक्षा अधिक रक्कम काढली आहे. भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी शाळेत बीईओ, ग्रा. पं. सदस्य, एसडीएमसी सदस्य, पालक व ग्रामस्थ यांची बैठक घेण्यात आली होती. त्यांनी सर्वासमोर सर्व आरोप कबूल केले आहेत. दोघांनीही सर्व रक्कम आठ दिवसांत दंडासह जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. पदाची सूत्रे नवीन मुख्याध्यापकांकडे देताना रक्कम जमा करण्याची सूचना केली होती. परंतु, दोघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे. या प्रकाराची चौकशी करुन त्यांच्याकडून आठ दिवसात रक्कम जमा करुन घ्यावी, असे निवेदन ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांना देण्यात आले.
यावेळी एसडीएमसी अध्यक्षा मिनाक्षी मुतगेकर, एसडीएमसी उपाध्यक्षा पूर्णिमा मोहिते, सदस्या अंबिका बडीगेर, प्रिया बाळेकुंद्री आदी उपस्थित होते.