बेळगाव : बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी लोकरीच्या विणकामातून विविध कलाकृती करून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवल्याबद्दल नाशिक येथील ग्राहक रक्षक समितीतर्फे त्यांना तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्यांनी १६६ अनोख्या लोकरीच्या वस्तू तयार केल्याबद्दल त्यांची ‘इन्क्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे.
आशा पत्रावळी यांनी जपानी विणकाम पद्धतीचा वापर करून विविध प्रकारचे पक्षी, फुले, कार्टून पात्रे आणि फळांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना यापूर्वीही लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि जैन सभा यांच्याकडून सन्मान मिळाला आहे. त्यांची विणकामावरील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
ग्राहक रक्षक समितीने आशा पत्रावळी यांचे समाजासाठी दिलेले योगदान आणि कलाक्षेत्रातील त्यांचे अपूर्व कार्य पाहून हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. हा पुरस्कार त्यांच्या कार्याचा उचित सन्मान असून, भविष्यात अधिकाधिक महिलांना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश आहे.