बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथे ठराविक घरांना पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. इतरांच्या नळाला जसा पाणीपुरवठा सुरळीत होतो त्याचप्रमाणे आमच्या देखील नळाला पाणीपुरवठा सुरळीत व्हावा अशा प्रकारची मागणी आनंदनगर भागातील महिला वर्गांनी केली आहे. आनंदनगर दुसरा क्रॉस येथील मोजक्या सात-आठ घरांच्या नळांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आणि उन्हाळ्यात एक तर दहा दिवसातून एकदाच पाणी येते. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत तर काही विहिरींमध्ये ड्रेनेजमिश्रित पाणी गेल्यामुळे ते पाणी वापरण्यायोग्य नाही त्यामुळे आनंदनगर भागातील या महिलांना पाण्यासाठी घागरी घेऊन भटकंती करावी लागत आहे. याबाबत महिलांशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, आमच्याकडे घरगुती नळ आहे. मात्र पाणी नाही आम्ही देखील इतर नागरिकांप्रमाणे नळपट्टी भरतो मग आमच्याच नळाला पाणी का येत नाही. नेमकी सात- आठ घरे सोडून परिसरातील नळांना पाणीपुरवठा कसा काय सुरळीत केला जाऊ शकतो असा प्रश्न या महिलांनी उपस्थित केला आहे. आनंदनगर परिसरात बऱ्याच नळांना थेट पाण्याची मोटर बसवली जाते. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार देखील यावेळी महिलांनी केली आहे. मोजक्या सात आठ घरांना पाणी येत नाही त्यामुळे त्यांना टँकर मागविणे किंवा पिण्यासाठी विकतचे पाणी आणणे हा पर्याय स्वीकारावा लागत आहे. तरी संबंधित लोकप्रतिनिधीनी त्याचप्रमाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सदर प्रकाराची चौकशी करावी व आनंदनगर भागात निःपक्षपातीपणाने सर्व घरांना पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावा अशी मागणी आनंदनगर दुसरा क्रॉस येथील महिलांनी केली आहे. लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली नाही तर महानगरपालिकेवर घागर मोर्चा काढण्याचा इशारा देखील या महिलांनी दिला आहे.