बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील चेन्नापूर डीएलटी तांडा येथे जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये मोठा वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या हाणामारीत एका वकिलाच्या कुटुंबातील 9 जणांवर 20 पेक्षा अधिक जणांनी प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप वकिलाने केला आहे.
या हल्ल्यात हल्लेखोरांनी कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर केल्याचे समजते इतकेच नाही तर ट्रॅक्टरचा अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्नही केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात वकील विनोद पाटील यांच्यासह त्यांचे वडील आणि भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. वकिलाच्या डोक्याला 11 टाके, त्यांच्या वडिलांना 32 टाके तर भावाला 5 टाके पडले आहेत. सर्व जखमींवर बागलकोट जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, वकील विनोद पाटील यांनी न्यायाची मागणी केली आहे. हाणामारी दरम्यान त्यांच्या भावाच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्नही करण्यात आल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे. याशिवाय त्यांच्या भावावर ट्रॅक्टर चालवून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही वकील विनोद पाटील यांनी केला आहे.या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.