
बेळगाव : राज्यात जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू असून लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे असे आज बेळगाव दौऱ्यावर आलेले राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेशी यांनी सांगितले. या वेळचे तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणूक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ऐवजी मतपत्रिकेवर अर्थात बॅलेट पेपरद्वारे घेण्याचा सरकारचा विचार सुरू असल्याचे देखील ते म्हणाले.
बेळगाव दौऱ्यावर असताना पत्रकारांसोबत बोलताना जी. एस. संग्रेशी म्हणाले की, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुका उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ होत्या त्यामुळे या निवडणुका घेण्यास विलंब झाला होता मात्र न्यायप्रविष्ठ असलेला वाद निकालात लागला असून लवकरात लवकर निवडणुका घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोग तयारी करीत आहे. 31 मे पूर्वी तालुका व जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत त्या दृष्टीने कर्नाटक सरकार उच्च न्यायालयात आरक्षण सादर करणार आहे यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल या संदर्भात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. लवकरच ग्रामपंचायतीचा कार्यकाळ देखील संपुष्टात येणार आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर केला जाईल असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बॅलेट पेपरचा विचार सुरू आहे मात्र यावर सरकार दरबारी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे जी. एस. संग्रेशी यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta