बेळगाव : मला वाटले नव्हते की, हायकमांड बसवराज पाटील- यत्नाळांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतील. मी हायकमांड तसेच वरिष्ठ नेत्यांशी याबद्दल चर्चा करून यत्नाळांची हकालपट्टी मागे घेण्याची विनंती करणार आहे, असे मनोगत माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, यत्नाळ यांच्या निलंबनाची माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्वरित प्रतिक्रिया दिली नाही, कारण आम्हाला लोकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या होत्या. यत्नाळ यांना पक्षातून निलंबित केले जाऊ शकते, याची कल्पना आम्हाला होती. मात्र, हायकमांडच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार मला नाही. पण, आम्ही त्यांना हा निर्णय मागे घेण्याची विनंती करू. पक्ष आम्हा सर्वांपेक्षा मोठा आहे, असे जारकीहोळी म्हणाले.
यत्नाळ यांच्यासह आम्ही सर्वजण शुक्रवारी बंगळुरू येथे बैठक घेणार आहोत. त्यानंतर हायकमांड आणि शिस्त समितीला निलंबन मागे घेण्याची विनंती कशी करावी, यावर चर्चा करू. यत्नाळ हे लिंगायत पंचमसाली समाजाचे तसेच भाजपचे मोठे नेते आहेत आणि त्यांचे निलंबन होऊ नये, अशी आमची भूमिका आहे. यत्नाळ यांना पक्षातून काढल्यामुळे आम्ही दुःखी आहोत, असे त्यांनी सांगितले.