
बेळगाव : बेळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरात भरदुपारी एका रिक्षाने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण रिक्षा जळून खाक झाली. विशेष म्हणजे, ही आग अपघाती नव्हती, तर हेतुपुरस्सर रिक्षा पेटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बेळगावच्या कोल्हापूर सर्कल परिसरात असलेल्या अयोध्या नगर येथे शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. अचानक रिक्षाने पेट घेतला आणि काही क्षणांतच ती पूर्णतः जळून खाक झाली. आगीचा फटका आजूबाजूच्या दुचाकींनाही बसला. घटनेनंतर नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
घटनेबाबत बोलताना हलगा येथील प्रशांत लक्ष्मण बोंम्मण्णावर या रिक्षामालकाने सांगितले, कि केंद्र बसस्थानकाजवळील रिक्षा थांब्यावर भाड्यासाठी झालेल्या वादानंतर राहुल आणि जगदीप या दोघांनी त्याला धमकी दिली होती की, तुझ्या रिक्षेला आग लावू. यानंतर, रिक्षा हळूवारपणे जात असताना दोघांनी त्यावर पेट्रोल टाकून आग लावली, असा आरोप प्रशांतने केला आहे. या संदर्भात त्याने माळमारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले. रिक्षाला लागलेल्या आगीमुळे आपल्या वाहनासह आसपास पार्किंगसाठी उभारण्यात आलेल्या अनेक दुचाकींचे नुकसान झाल्याचे घटनास्थळासमोर असलेल्या कार्यालयात काम करणारे मोहम्मद साधिक मुल्ला यांनी सांगितले.