बेळगाव : शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बेळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या १० वर्षांत कोणत्याही गुन्ह्यात सामील नसलेल्या १० जणांची नावे राऊडी शिटर यादीतून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी आयोजित राऊडी शिटर परेडनंतर पोलिस आयुक्त ययाडा मार्टिन मार्बनयांग यांनी ही माहिती दिली.
शनिवारी बेळगाव जिल्हा पोलीस मैदानावर एपीएमसी, माळमारुती, मार्केट, शहापूर, कॅम्प, उद्यमबाग, खडेबाजार, वडगाव, हिरेबागेवाडी, मारीहाळ आणि काकती या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील राऊडी शिटर्सची परेड घेण्यात आली. यावेळी २०० हून अधिक राऊडी शिटर्सना समुपदेशन करण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बनयांग म्हणाले, गेल्या १० वर्षांत कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नसलेल्या १० जणांची नावे राऊडी शिटर यादीतून हटवण्याचे निर्देश दिले आहेत. उर्वरित रावडी शिटर्सची पुनरावलोकन प्रक्रिया सुरू असून, टप्प्याटप्प्याने योग्य ती कारवाई केली जाईल. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांचे नावही राऊडी यादीत आल्याने त्यांच्या अनुपस्थितीतबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले, आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. ते जर दोषी असतील, तर कायदेशीर कारवाई होईल. पुढील परेडमध्ये त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.